सिद्धबली इस्पात लिमी च्या पूर्वीच्या कामगारांचे थकीत येत्या एक महिन्यात अदा करावे - हंसराज अहीर, पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री
हंसराज अहीर यांचे सहायक कामगार आयुक्त व कामगारांच्या बैठकीत स्पष्ट सूचना
चंद्रपुर : उदयोगातील पूर्वीच्या कामगारांचे सर्व बकाया / आर्थिक मोबदला देऊनच नवीन व्यवस्थापनाने आपले उद्योग उत्पादन सुरु करावे तसेच या अनुभवी कामगार कर्मचाऱ्यांना रोजगारांत प्राथमिकता द्यावी असे असतांनाही ताडाळी एमआयडीसी येथील सिद्धबली इस्पात लिमी उद्योग संचालक/ व्यवस्थापनाने या कामगार/ कर्मचाऱ्याचे हक्क हिसकावले आहे याचा निषेध करीत या सर्व कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे हि आग्रही भूमिका असून कामगारांचे येत्या एक महिन्यात सर्व आर्थिक बकाया आजपर्यंतच्या व्याजासह अदा करावे अशा सूचना पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सहायक कामगार आयुक्त नि. पां. पाटणकर यांना बैठकीच्या माध्यमातून दिले.
या बैठकीला भाजप महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य विजय राऊत, खुशाल बोंडे, जिल्हा परिषद् सदस्य रणजीत सोयम, डॉ. शरद रणदिवे, सोनेगांव सरपंच संजय संजय उकीनकर , येरुर चे सरपंच मनोज आमटे, ताडाळीचे उपसरपंच निखिलेश चांभारे, पडोली चे ग्राम पंचायत सदस्य विक्की लाड़से, विकास खटी, विनोद खेवले, तसेच सिद्धबली इस्पात च्या पूर्वीच्या कामगारांची उपस्थिती होती.
सिद्धबली इस्पात लिमी ने पूर्वीच्या स्थानिक कामगारांवरती थेट अन्याय केला असून हा अन्याय कुठल्याही परिस्थितीत सहन केल्या जाणार नसल्याची प्रखर भूमिका यावेळी हंसराज अहीर यांनी मांडली. नियमानुसार सिद्धबली उद्योग संचालनकांनी या कामगारांना आर्थिक मोबदला दिला पाहिजे तसेच त्यांना रोजगार सुद्धा उपलब्ध करून देणे अपेक्षित असतांना त्यांचे हे वर्तन निषेधार्ह आहे असेही यावेळी अहीर यांनी सांगितले. या सर्व कामगारांची सविस्तर यादी सहायक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयास सादर करून या सर्व कामगारांना संपूर्ण आर्थिक मोबदला मिळेल व रोजगारात प्राधान्य मिळेपर्यंत आपण हा मुद्दा रेटून धरणार असून सिद्धबली उद्योगाचा मनमानी कारभार बंद करणार असल्याचा इशाराही यावेळी अहीर यांनी दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयात दि. ३०/७/२०१९ रोजी जिल्हाधिकारी महोदयांसमोर या सर्व कामगारांचे थकीत अदा करण्याच्या सूचना देण्यात सिद्धबली इस्पात च्या संचालकांना देण्यात आल्या होत्या, त्या सूचनांचे संचालकांनी पालन न केल्यामुळे सहायक कामगार आयुक्त कार्यालयाकडून दि. १८/११/२०१९ रोजी पत्राच्या तसेच शाब्दिक सूचना दिल्यानंतरही संचालकांनी कुठलीही कार्यवाही घेतली नसल्याची गंभीर माहिती यावेळी सहायक कामगार आयुक्त यांनी अहीर यांना दिली. जिल्हाधिकारी महोदयांच्या व सहायक कामगार आयुक्त यांच्या आदेशाचे अवहेलना करणाऱ्या सिद्धबली उद्योगावर नियमाला अनुसरून कडक कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी अहीर यांनी सहायक कामगार आयुक्त यांना दिले.
मागील आठवड्यात मध्यप्रदेश निवासी कामगाराचा उद्योग कार्यक्षेत्रात अपघाती मृत्यू झाला असतांना या मृत कामगाराच्या परीवाला अद्यापही या उद्योग व्यवस्थापनाने आर्थिक मोबदला दिला नसल्याने या मृत कामगाराच्या परीवाराला त्वरित मोबदला देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी तसेच स्थानिक कामगार मारोती रोगे याचा मृत्यू झाल्यानंतरही त्याच्या परिवाराला आर्थिक मोबदला मिळाला नाही, मृत रोगे याच्या परिवाराची निरंतर अवहेलना या उद्योग मालकाकडून होत असतांना त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी अशा सूचना यावेळी हंसराज अहीर यांनी या बैठकीच्या माध्यमातून दिल्या.
सर्व कामगारांना त्यांचे आर्थिक बकाया व्याजासह थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करावे, पूर्वी काही कामगारांची फसवणूक करून त्यांना कमी मोबदला दिला असल्याने याची चौकशी करून त्यांना योग्य मोबदला मिळवून देणे, कार्यरत व भविष्यात काम मिळणाऱ्या सर्व कामगारांना किमान वेतन नियमाप्रमाणे वेतन मिळावे याची खातरजमा करणे, सर्व कामगारांचा भविष्य निर्वाह निधी जमा करावा, सद्यस्थितीत उद्योगात परप्रांतीय २०० कामगारांचा भडीमार असल्याने सर्व कामांमध्ये स्थानिकांना प्राध्यान्य द्यावे अशा विषयांना घेत हंसराज अहीर यांनी सहायक कामगार आयुक्त यांना बैठकीच्या माध्यमातून सूचना दिल्या आहेत.