शेकडो नागरिकांनी केल्या तक्रारी, उपाययोजना आणि सूचना
चंद्रपूरकरांचा ध्यास, चंद्रपूरचा विकासचे आयोजन
चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचा पुढाकार
#Loktantrakiawaaz
चंद्रपूर : चंद्रपूर शहराला (Chandrapur City) ५०० वर्षांचा इतिहास लाभला आहे. मात्र, या ऐतिहासिक शहराचा अजूनही पाहिजे त्या प्रमाणात विकास झालेला नाही. त्यामुळे चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने चंद्रपूरकरांचा (Chandrapur City District Congress Comitee) ध्यास, चंद्रपूरचा विकास या खुले चर्चासत्राचे आयोजन केले होते. यावेळी शेकडो नागरिकांनी वेगवेगळ्या सूचना, उपाययोजना करीत चंद्रपूर शहराच्या विकासाचा निर्धार केला.
चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांच्या पुढाकारातून शनिवारी (ता. ९) येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात (Chandrapur District Central Co-Operative Bank Sabhagruh) हा कार्यक्रम पार पडला. यावेळी खासदार बाळूभाऊ धानोरकर (Khasdar Balu Dhanorkar) यांनी, कोणत्याही सभागृहात जाणाऱ्या व्यक्तीकडे विकासाचे व्हिजन असायला हवे. समाजातील शेवटच्या घटकाचा विकास व्हावा, याचे नियोजन करण्यासाठी प्रत्येक नगरसेवकांनी प्रशिक्षण घ्यायला हवे. पाणीटंचाईच्या समस्येवर तोडगा म्हणून प्रत्येक नागरिकांनी जमिनीत पाणी मुरवावे, असे आवाहन केले.
प्रा. सुरेश चोपणे यांनी, या शहरात पाण्याचे नियोजन करू शकलो नाही, ही शोकांतिका आहे. शहरातील वाहतूक समस्या, सायकलचा वापर करण्यावर भर, मिनी बससेवा, किल्ल्यांभोवती रिंगरोड (Ring Road), वेगवेगळ्या ठिकाणी मार्केटची सुविधा, वृक्षलागवड, पाण्याचे नियोजन, भूमिगत वीज वाहिनी, वास्तू संग्रहालयाची आवश्यकता, शहराचे विद्रुपीकरण अशा अनेक समस्या आणि त्यावरील उपाययोजना सांगितल्या. तसेच सर्वांनी एकत्रित आल्यात या समस्या निकाली निघतील, असा विश्वासही व्यक्त केला.
प्रा. योगेश दुधपचारे यांनी, शुद्ध पाण्याचा शहराचा इतिहास (History) आहे. मात्र, आज येथील पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. युरोपातील नद्या बघण्यासाठी नागरिक जातात. मात्र, अजूनही येथील नद्यांचे शुद्धीकरण झालेले नाही. रामाळाचे संवर्धन व्हावे, अतिक्रमण हटविण्यात यावे, तापमान वाढत आहे. त्यावर उपाययोजना शोधावी. सोलारला प्राधान्य देत सायकल सिटी तयार करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
बंडू धोतरे यांनी, काँग्रेस पक्षाचा हा पुढाकार कौतुकस्पद आहे. सर्व राजकीय पक्षांनी आपला अजेंडा तयार करावा. शहरातील प्रत्येक प्रभागात आरोग्य केंद्रे सुरु करावे, अग्निशमन वाहने जाण्याएवढे रस्ते तयार करावे, अशा सूचना केल्या. मकसूद शेख यांनी, वाढलेले शहर बघता शहरातील वडगाव, तुकूम प्रभागात श्मशानभूमीची आवश्यकता आहे. ज्युबिली हायस्कुलच्या (Jublee Highschool) मैदावनावर स्टेडियम (Stadium) तयार करावे, असे सांगितले. तर, प्रा. श्याम हेडाऊ यांनी, प्रत्येक राजकीय पक्षांनी शहराचा किमान पंचवार्षिक आराखडा तयार करून त्यानुसार कामे करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी चंद्रपूरकरांच्या वतीने भाविक येरगुडे, विजय खनके, शैलेश जुमडे, मनोहर रामटेके, प्रमोद बोरीकर, दामोदर सारडा, वनश्री मेश्राम, राकेश मार्कंडेवार, अजय दुबे, मकसूद खान, सुनीता अग्रवाल, अलका मोटघरे, निमेश मानकर यांनी, इरई नदीवर बंधारा बांधवा, स्मशानभूमीची समस्या, कचरा, प्लॅस्टिक वापर, खुल्या भूखंडावर अभ्यासिका तयार करणे, किल्ल्यांचे जतन, मोकाट जनावरांची समस्या, बचतगट महिलांना प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी सुविधा, आयटी पार्क उभारण्यात यावा अशा समस्या आणि नवीन कल्पना सादर केल्या.
प्रास्ताविकातून रामू तिवारी यांनी, कार्यक्रमाच्या आयोजनामागील उद्देश विशद केला. संचालन मनीष तिवारी यांनी, तर आभार कुणाल चहारे यांनी मानले. कार्यक्रमाला कामगार नेते के. के. सिंग, माजी महापौर संगीता अमृतकर, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष चित्राताई डांगे, शहर जिल्हाध्यक्ष सुनीताताई अग्रवाल, नगरसेवक पप्पू देशमुख, माजी नगरसेवक संजय वैद्य यांच्यासह काँग्रेसच्या सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि चंद्रपूर शहरातील सुजान नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.