चंद्रपुर जिल्ह्यातील बँकांनी पीक कर्ज वाटपाची गती वाढवावी – जिल्हाधिकारी गुल्हाने, जिल्हास्तरावर ‘क्रेडीट आऊटरिच प्रोग्रामचे’ आयोजन Banks in Chandrapur district should speed up disbursement of crop loans - District Collector Gulhane organizes 'Credit Outreach Program' at district level

चंद्रपुर जिल्ह्यातील बँकांनी पीक कर्ज वाटपाची गती वाढवावी  – जिल्हाधिकारी गुल्हाने

Ø जिल्हास्तरावर ‘क्रेडीट आऊटरिच प्रोग्रामचे’ आयोजन

#Loktantrakiawaaz
चंद्रपूर, दि. 8 जून : यावर्षीच्या खरीप हंगामाला सुरवात झाली आहे. अतिशय महत्वाच्या असलेल्या या हंगामात शेतक-यांना पीककर्जाची आवश्यकता असते. त्यामुळे शेतक-यांना दिलासा देण्यासाठी बँकांनी पीक कर्ज वाटपाची गती वाढवावी, असे निर्देश  जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिले.

नियोजन सभागृहात जिल्हा अग्रणी बँकेच्या वतीने ‘क्रेडीट आऊटरीच प्रोग्राम’ अंतर्गत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर बँक ऑफ इंडियाचे झोनल मॅनेजर तुषार हाते, आरबीआयचे प्रतिनिधी अभिनय कुमार, बँक ऑफ महाराष्ट्रचे भास्कर देव, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक रमेश खाडे, नाबार्डचे महाव्यवस्थापक तृणाल फुलझेले, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रशांत धोंगळे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक स्वप्नील राठोड, स्टेट बँकेचे पृनेंद्र मिश्रा आदी उपस्थित होते.
गतवर्षी जिल्ह्याला देण्यात आलेले पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट बँकांनी चांगल्यारितीने पूर्ण केले, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, गावातील तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, प्रतिष्ठित नागरिक, लोकप्रतिनिधी यांच्याशी समन्वय साधून बँकांनी शेतक-यांना कर्ज उपलब्ध करून द्यावे. जास्तीत जास्त शेतक-यांना पीक कर्ज वेळेवर मिळाले पाहिजे, या दृष्टीने नियोजन करा. देशभरात स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त 6 ते 12 जून या कालावधीत ‘आयकॉनिक वीक’ साजरा करण्यात येत आहे. बँकांच्या सेवा तसेच केंद्र व राज्य शासनाच्या योजना गावागावात पोहचविण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत असून यात बँकांची भुमिका महत्वाची आहे. त्यासाठी केवळ जिल्हास्तरावर हे अभियान मर्यादीत न राहता तालुक्याच्या ठिकाणी किंवा मोठ्या गावापर्यंत बँकांनी पोहचावे.
पुढे जिल्हाधिकारी म्हणाले, महिला बचत गटांना कर्जाचा पुरवठा करण्यामध्ये चंद्रपूर जिल्हा राज्यात प्रथम आहे, ही अतिशय आनंदाची बाब आहे. महिला बचत गटाची कर्जाची परतफेड ही 99 टक्के असल्यामुळे बँकांनी जास्तीत जास्त बचत गटांना कर्ज द्यावे. तसेच किसान क्रेडीट किसान कार्ड (केसीसी) अंतर्गत आता पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसायचा लाभ घेता येतो. त्यामुळे केसीसीचे वाटप करा. जोपर्यंत बँका लोकाभिमुख होत नाही, तोपर्यंत योजनांची प्रभावी अंमलबजावणी होणार नाही. ग्राहकांमुळेच बँकांचे अस्तित्व आहे, हे लक्षात ठेवून ग्राहकांशी सौजन्याने वागा. नागरिकांच्या तक्रारी येऊ देऊ नका. अर्थ साक्षरता तसेच डीजीटल साक्षरता ही काळाची गरज आहे. त्यासाठी बँकांनी प्रयत्न करावे. प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री सुरक्षा योजना, मुद्रा कर्जवाटप योजना, स्व:निधी योजना, प्रधानमंत्री आवास योजना तसेच मुख्यमंत्री रोजगार कार्यक्रम यांच्यासह विविध योजनांची माहिती घेऊन नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिका-यांनी केले.
यावेळी झोनल मॅनेजर श्री. हाते म्हणाले, देशाच्या जडणघडणीत बँकांचा मोठा हातभार आहे. 1969 मध्ये आपण क्लास बँकिंगकडून मास बँकिंगकडे वळलो. आज देशभरात प्रधानमंत्री जनधन योजनेचे 45 कोटी खातेदार असून त्यात 1.6 लक्ष कोटी रुपये एवढी रक्कम आहे. केंद्र सरकारच्या बँकिंगच्या योजनांची व्याप्ती सर्वसामान्य व गरजू लोकांपर्यंत पोहचविण्याचे हे एक माध्यम आहे. ‘आऊटरीच’ म्हणजे लोकांपर्यंत बँकांनी पोहचणे, असे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते महिला बचत गट व लाभार्थ्यांना बँकांच्या योजनांचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यात संघमित्रा महिला बचत गट (निंबाळा), अहिल्याबाई महिला बचत गट यांच्यासह अनिल बोकडे, दीपक रणदिवे, सुर्यभान तेलंग, जफ्फारखान पठाण, निखील खोब्रागडे, महेश डवले, महेंद्र रामटेके, परीक्षित तिवारी आदींचा समावेश होता.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अग्रणी बँक व्यवस्थापक प्रशांत धोंगळे यांनी तर संचालन मनोज जैन यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Banks in Chandrapur district should speed up disbursement of crop loans - District Collector Gulhane organizes 'Credit Outreach Program' at district level.

बातमी व अपडेट साठी loktantrakiawaaz.co. in वर क्लिक करा.