गणेश विसर्जनाच्या पार्श्वभुमीवर चंद्रपुर शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल, पोलिस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन, अशी असेल चंद्रपुर शहरातील वाहतूक व्यवस्था Changes in the traffic system in Chandrapur city on the background of Ganesh immersion, appeal to the police administration to cooperate, the traffic system in Chandrapur city will be like this

▶️ गणेश विसर्जनाच्या पार्श्वभुमीवर चंद्रपुर शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

▶️ पोलिस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन

▶️ अशी असेल चंद्रपुर शहरातील वाहतूक व्यवस्था

चंद्रपूर दि. 6 सप्टेंबर :  मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 33 (1)(ब )नुसार सार्वजनिक ठिकाणाची रहदारी व सुव्यवस्था राखण्यासाठी करावयाच्या नियमानासाठी चंद्रपूर शहरामध्ये दि. 9 सप्टेंबर 2022 रोजी सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जनाच्या कार्यक्रमांमध्ये रहदारीला अडथळा होऊन जनतेला त्रास होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून चंद्रपूर शहरातील मुख्य मिरवणुकीचा मार्ग दि. 9 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजेपासून ते दि. 10 सप्टेंबर रोजीचे पहाटे 6 वाजेपर्यंतच्या कालावधीसाठी सर्व प्रकारच्या वाहनांची रहदारी वळविण्यात येत आहे. असे जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी कळविले आहे.

गणेश विसर्जन मुख्य मिरवणूक सोहळा पार पडेपर्यंत प्रियदर्शनी चौक ते जटपुरा गेट-कस्तुरबा चौक मार्गे गांधी चौक ते जटपुरा गेट मार्गे, रामनगर रोड मार्गे संत केवलराम चौक-इरई नदी (दाताळा पूल) हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांकरीता बंद करण्यात येत आहे. नागपूर रोडने येऊन बल्लारशा किंवा मुलकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने ही प्रियदर्शनी चौककडे जाण्यास बंदी करून सर्व प्रकारची वाहने ही वरोरा नाका उड्डाणपूल-सावरकर चौक ते बंगाली कॅम्प, मूल किंवा बल्लारशाकडे जातील.

मूल किंवा बल्लारशाकडून नागपूरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने ही बंगाली कॅम्प-सावरकर चौक वरोरा नाका नवीन उड्डाणपूल मार्गे नागपूरकडे जाण्याचे निर्देश देण्यात येत आहे.  नागपूरकडून शहरांमध्ये जाणारी सर्व वाहने (जड वाहने वगळून) छोटा नागपूर मार्गे दाताळा चौक-देवाळा गांव-चोराळा टी पॉइंटवरून बिनबा गेट किंवा पठाणपुरा गेटमधून शहरात प्रवेश करतील. चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील रहीवाशांनी नागपूर, वणी, घुगुस व गडचांदूरकडे जाण्याकरीता रहमत नगर, नगीनाबाग व इतर परिसरातून जाण्यासाठी बिनबा गेट-चोराळा-दाताळा इत्यादी मार्गाचा अवलंब करावा. बल्लारशा व मूल कडून येणाऱ्या सर्व वाहनांना (जड वाहने वगळून) शहरांमध्ये जावयाचे असल्यास बसस्टॅन्ड-एलआयसी ऑफिस-बगड खिडकी मार्गे किंवा जुनोना चौकातून शहरामध्ये किंवा प्रसन्ना पेट्रोल पंपकडून बाबूपेठ मार्गे शहरात फक्त अंचलेश्वर गेटपर्यंत प्रवेश करता येईल.

■ या ठिकाणी असेल नो पार्किंग व नो हॉकर्स झोन:
गणेश विसर्जन मुख्य मिरवणूक सोहळ्या दरम्यान नो पार्किंग झोन व नो हॉकर्स झोन करण्यात आले आहे. जटपुरा गेट ते कस्तुरबा चौकपर्यंत, जटपुरा गेट ते रामनगर रोड मार्गे दाताळा पुलापर्यंत, जटपुरा गेट ते प्रियदर्शनी चौकापर्यंत, कस्तुरबा चौक ते गांधी चौक ते जटपुरा गेट, कस्तुरबा चौक ते अंचलेश्वर गेटपर्यंत, गांधी चौक ते मिलन चौक ते जोड देऊळपर्यंत, कस्तुरबा चौक ते जेलरोड चौक, दस्तगीर चौक ते मिलन चौक, मिलन चौक ते बजाज पॉलीटेक्निक कॉलेज, हिंदी सिटी हायस्कूल ते रघुवंशी कॉम्प्लेक्स पर्यंत, मौलाना आझाद चौक ते जयंत टॉकीज, छोटा बाजार चौक ते पाताळेश्वर मंदिर या मार्गांवर नो पार्किंग व नो हॉकर्स झोन म्हणून घोषित केल्याने मिरवणूक व वाहतूक मार्गावर नागरिकांनी, व्यावसायिकांनी तसेच गणेश विसर्जन भक्तांनी कोणत्याही प्रकारची वाहने पार्किंग किंवा उभी करू नये.

मुख्य मिरवणूक मार्गावर राहणाऱ्या रहिवाशांना स्वतःच्या पार्किंगकरीता जागा नसल्यास त्यांनी आपली वाहने जुबली हायस्कूलचे पटांगण, महानगरपालिकेच्या बाजूला असलेली पार्किंग या ठिकाणी उभी करता येईल परंतु, मिरवणूक संपल्यानंतरच ती वाहने तेथून काढता येतील. त्याचप्रमाणे, चंद्रपूर शहरात मोठ्या प्रमाणात साजरा होणारा गणपती विसर्जन सोहळा पाहण्यासाठी शहरातील व इतर ग्रामीण भागातून नागरीक येत असतात. दरम्यान शहरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून नागरिकांना पार्किंग झोन उपलब्ध करून देण्यात येत आहे.

■ चंद्रपुर शहरातील व इतर ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांसाठी उपलब्ध पार्किंग झोन:

चांदा क्लब ग्राउंड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज वरोरा नाका, सेंट मायकल हायस्कूल नगीनाबाग, सिंधी पंचायत भवन, संत केवलराम चौकाजवळ रामनगर, व्यायाम शाळा ग्राउंड पठाणपुरा चौक, डी.एड. कॉलेज ग्राउंड बाबूपेठ, महाकाली मंदिर ग्राउंड ही ठिकाणे दि. 9 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजता पासून दि. 10 सप्टेंबर 2022 रोजीचे सकाळी 6 वाजेपर्यंत नागरिकांसाठी पार्किंग स्थळे म्हणून घोषित करण्यात येत आहे. नागरीकांनी आपली वाहने शहरात न आणता या पार्किंग स्थळी पार्क करावीत. जनतेने विसर्जनादरम्यान वरील वाहतूक व्यवस्थेचे पालन करून शांतता व सुव्यवस्था अबाधित राखावी व पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी केले आहे.
Changes in the traffic system in Chandrapur city on the background of Ganesh immersion, appeal to the police administration to cooperate, the traffic system in Chandrapur city will be like this