◆ जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व व्हिजन रेस्क्यू यांचा संयुक्त उपक्रम
चंद्रपूर, दि. 14 ऑक्टोबर : मानवी तस्करी हा विषय संपूर्ण जगामधे अतिशय गंभीर होत चालला आहे. या विषयाकडे सामान्य नागरिकांच लक्ष जावं , त्यांनीही सजग व्हावं या दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर व व्हिजन रेस्क्यू यांच्या संयुक्त विद्यमाने वाॅक फाॅर फ्रिडम चे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश समृद्धी भिष्म, जिल्हा विधीसेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी, तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रशांत काळे, प्रभारी मुख्य न्यायदंडाधिकारी प्रवीण कुलकर्णी, चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. अभय पाचपोर आणि सचिव आशिष धर्मपुरीवार, व्हिजन रेस्क्यू संस्थेचे प्रतिनिधी भुषण तोंडरे , वाॅक फाॅर फ्रिडम चंद्रपूर जिल्हा समन्वयक शाम हेडाऊ आदिंची उपस्थिती होती.
वाॅक फाॅर फ्रिडम मधे चंद्रपूर शहरातील सर्व महाविद्यालयाचे विद्यार्थी व प्राध्यापक वृंद, जिल्हा व सत्र न्यायालयाचे कर्मचारी , जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयाचे कर्मचारी,चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य, ईको - प्रो चे बंडू धोत्रे, विद्यार्थी संघटना आदिंचा समावेश होता.
यावेळी बोलतांना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश समृद्धी भिष्म यांनी, मानवी तस्करी हा अतिशय गंभीर विषय असून याबाबत आपण सगळ्यांनी जागरुक रहायला हवं, सजग रहायला हवं व आवश्यक तिथे लगेच समोर येत संबंधित विभागाला तक्रार करायला हवी यासाठीच हा वाॅक फाॅर फ्रिडम आपण घेत आहोत, असे मत व्यक्त केले. तर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव सुमित जोशी यांनी प्रास्ताविकातून मानवी तस्करी या विषयाची सविस्तर माहिती देत कार्यक्रमाच्या आयोजनामागची भुमिका विषद केली.
तत्पूर्वी श्रीमती भिष्म यांनी झेंडा दाखवून वाॅक फाॅर फ्रिडमला स्थानिक गांधी चौक येथून सुरुवात केली. सदर रैली जटपूरा गेटला वळसा घालून कस्तुरबा रोड मार्गे परत गांधी चौक येथे वाॅक फाॅर फ्रिडमची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमाचे संचालन शाम हेडाऊ यांनी तर आभार व्हिजन रेस्क्यूचे भुषण तोंडरे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी धनंजय साखरकर, देवानंद साखरकर, शैलेश दिंडवार, चिन्मय भागवत, पियुष बनकर, आदित्य गचकेश्वर, ओंकार सायंकार, तन्मय बनकर, ओंकार बक्षी आदिंनी अथक परिश्रम घेतले.
A joint initiative of Walk for Freedom, District Legal Services Authority and Vision Rescue in Chandrapur to draw attention to the issue of human trafficking.