जिल्हाधिका-यांनी निर्गमित केले आदेश
चंद्रपूर, दि.21 जुलै : गत 48 तासांपासून चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून काही तालुक्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच प्रादेशिक हवामान खात्याने सोमवार दि. 22 जुलै रोजी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभुमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, शाळा आणि महाविद्यालये 22 जुलै 2024 रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी निर्गमित केले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात 19 व 20 जुलै रोजी अनेक तालुक्यात अतिवृष्टी होऊन अनेक रस्ते पाण्याखाली गेले. तसेच गावांना पुराचा वेढा पडल्याने जनजीवन विस्कळीत होण्याच्या घटना घडल्या आहेत. हवामान खात्याने 21 व 22 जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये व अतिवृष्टीमुळे शालेय विद्यार्थ्यांवर कोणताही परिणाम होऊ नये, याकरिता चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळा, विद्यालय व महाविद्यालय यांना 22 जुलै 2024 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे व सदर आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी. तसेच भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक खबरदारी घ्यावी व आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर दूरध्वनी क्रमांक 07172 - 250077 तसेच 07172 -272480 या क्रमांकावर संपर्क करावा, असेही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद आहे.
On July 22, schools and colleges in Chandrapur district were closed, orders were issued by the District Collector