महाराष्ट्र राज्यात 18 नवीन कोरोना बाधित रुग्ण; राज्यातील एकूण रुग्ण संख्या 107


मुंबई, दि. 24 (का. प्र.) : महाराष्ट्र राज्यात काल रात्रीपासून कोरोनाच्या 18 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 107 झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये मुंबईचे 6, सांगली मधील  इस्लामपूरचे 4, पुण्याचे 3, सातारा जिल्ह्यातील 2 तर अहमदनगर, कल्याण - डोंबिवली आणि ठाणे येथील प्रत्येकी 1 रुग्ण आहे. या नवीन बाधित रुग्णांपैकी सर्वाधिक म्हणजे 8 रुग्णांनी मध्यपूर्वेतील देशांमध्ये प्रवास केला आहे. तर इतर काही जणांनी अमेरिका, इंग्लंड आणि पेरु या देशात प्रवास केला आहे. दोन जण पूर्वी बाधित आढळलेल्या रुग्णाचे निकट सहवासित आहेत असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
दरम्यान, काल संध्याकाळी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात कोरोना बाधित असलेल्या एका 65 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. दुबई मध्येच स्थायिक असलेले हे गृहस्थ दिनांक 15  मार्च 2020 रोजी अहमदाबाद येथे पाठीच्या दुखण्यावरील उपचारासाठी आले होते. त्यानंतर ते मुंबईत आले. दिनांक 20  मार्च 2020 पासून त्यांना ताप येणे सुरु झाले. खाजगी वैद्यकीय व्यावसायिकाकडे उपचार घेत असतानाच  त्यांना खोकला आणि श्वासास त्रास व्हायला सुरु झाले. दिनांक 23  मार्च रोजी ते कस्तुरबा रुग्णालयात गंभीर अवस्थेत दाखल झाले. त्याच दिवशी संध्याकाळी त्यांचा मृत्यू झाला. त्यांना अनियंत्रित मधुमेह आणि उच्च रक्तदाब होता. कोरोनामुळे राज्यात झालेला हा तिसरा मृत्यू आहे. 

राज्यातील जिल्हा आणि मनपा निहाय रुग्णांचा तपशील असा:

पिंपरी चिंचवड मनपा - 12
पुणे मनपा - 18
मुंबई -41
नवी मुंबई, कल्याण डोंबिवली- 5
नागपूर, यवतमाळ,सांगली -  प्रत्येकी - 4
अहमदनगर, ठाणे-   प्रत्येकी  -3
सातारा- 2
पनवेल, उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी, वसई विरार,पुणे ग्रामीण- प्रत्येकी 1

एकूण-107   (मृत्यू 3)

राज्यात आज परदेशातून आलेले 387  प्रवासी सर्वेक्षणाखाली दाखल झाले आहेत. राज्यात सध्या 11 हजार 97 लोक घरगुती विलगीकरणात ( होम क्वारंटाईन)  आहेत.   18 जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत 2531 जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी 2144 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 107  जण पॉझिटिव्ह आले आहेत.
केंद्र शासनाच्या सूचनेनुसार अतिजोखमीच्या देशातून येणाऱ्या प्रवाशांना संस्थात्मक पातळीवर क्वारंटाईन करण्यात येत असून सध्या 880  प्रवासी क्वारंटाईन संस्थांमध्ये आहेत.

आरोग्य खात्यामार्फत आवाहन
🟥     पुणे - मुंबईच्या लोकांबद्दल नाहक भीती नको - मागील एक - दोन दिवसात पुणे - मुंबई मधील लोक आपापल्या गावी जाताना दिसत आहेत. काही ग्रामीण भागात पुणे आणि मुंबईहून आलेल्या लोकांबद्दल भितीचे वातावरण आहे, या लोकांची करोना टेस्ट करुन घ्यावी, अशी मागणी काही तुरळक ठिकाणी होताना दिसते आहे. ग्रामीण भागात पुणे आणि मुंबईहून आलेल्या व्यक्तींच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. पुणे - मुंबई अथवा राज्यातील इतर भागातून आलेल्या व्यक्तींच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारणे अपेक्षित नाही. तसेच कोणावरही करोनाच्या भीतीने बहिष्कार टाकण्यात येऊ नये.
🟥     दवाखाने आणि औषध दुकाने उघडी ठेवा - अनेक ठिकाणी वैद्यकीय व्यावसायिकांनी ओपीडी बंद ठेवल्याचे आढळले आहे. अशा उद्रेक काळात उद्रेकाशिवाय इतर आरोग्य सेवा तसेच तातडीची वैद्यकीय सेवा जनतेला मिळणे आवश्यक असल्याने कोणीही ओपीडी अथवा इतर आरोग्य सेवा बंद ठेवू नयेत तसेच औषध दुकानेही उघडी असावीत, असे कळकळीचे आवाहन आरोग्य खात्यामार्फत करण्यात आले आहे.
🟥     प्रत्येक ताप, खोकला म्हणजे कोरोना नव्हे. -काही ठिकाणी वैद्यकीय व्यावसायिक किरकोळ सर्दी खोकला असलेल्या रुग्णाला कोरोनासाठी तपासणी करण्यास सांगत आहेत. तसेच अशा रुग्णाला डॉक्टर तपासण्यास नकार देत असल्याबाबतच्या काही तुरळक तक्रारी कॉलसेंटरला प्राप्त होत आहेत. हे अत्यंत चुकीचे आहे. प्रत्येक सर्दी खोकला म्हणजे कोरोना नव्हे, हे लक्षात घेणे आवश्यक आहे.डॉक्टरांनी अशा रुग्णांना वैद्यकीय सेवा नाकारणे, योग्य नाही. ताप सर्दी खोकला ही लक्षणे असल्यास आणि परदेश प्रवास किंवा बाधित रुग्णाच्या सहवासाचा इतिहास असेल तरच अशा रुग्णांची करोना तपासणी आवश्यकआहे.
🟥     परदेशातून आलेल्या लोकांवर बहिष्कार टाकू नका - काही ठिकाणी परदेशाहून आलेल्या आणि होम क्वारंटाईनमध्ये असणाऱ्या व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबावर बहिष्कार टाकणे अथवा त्यांना सोसायटीमधून निघून जाण्यास सांगणे, अशा घटना घडल्याच्या तक्रारी कॉल सेंटरला प्राप्त होत आहेत.  परदेशातून आलेल्या प्रत्येक व्यक्तीला होम क्वारंटाईन पूर्ण करण्यासाठी सहकार्य करणे, हे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे.