कोरोना प्रतिबंधासाठी जनतेने गरज नसतानाघराबाहेर पडूच नये : ना. विजय वडेट्टीवार समाजाच्या भल्यासाठी आवश्यकतेनुसार सक्त कारवाई करा


-  समाजाच्या भल्यासाठी आवश्यकतेनुसार सक्त कारवाई करा

-  हातावर पोट असणाऱ्या कामगारांना, मजुरांना 10 ते 15 किलो धान्य देणार

-   आजपासून जिल्ह्याच्या सर्व बाजुने सीमा बंद करणार

-   खाजगी वाहनांवरही आज पहाटेपासून बंदी

-   वन अकादमीमध्ये आवश्‍यकतेनुसार कॉरेन्टाईन करणार

-  पुणे, मुंबई वरून आलेल्या नागरिकांनी स्वतःहून काळजी घेण्याचे आवाहन

-  सर्व सरकारी कार्यालयाचे निर्जंतुकीकरण करणार

-   जिल्ह्यात अद्याप एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही

-  वृत्तपत्र वाहनांना व वृत्तपत्र विक्रेत्यांना नियमित कामांसाठी परवानगी

-  पीककर्ज भरण्यासाठी मुदत वाढ देणार

चंद्रपूर, दि. 23  मार्च : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. मात्र भविष्यातील परिस्थिती अतिशय कठीण असून या परिस्थितीमध्ये व्यापक जनहित बघता आवश्यकतेनुसार प्रशासनाने सक्तीने कारवाई करणे गरजेचे आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील तमाम नागरिकांना विनंती आहे की, त्यांनी गरज नसताना घराबाहेर पडूच नये. पुढील आदेशापर्यंत घरातच थांबावे,असे आवाहन राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये खासदार ना. बाळू उपाख्य सुरेश धानोरकर यांच्या  उपस्थितीत जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणांच्या विभागप्रमुखांची त्यांनी बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते, जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता एस.एन. मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत, यांच्याशिवाय विविध विभागाचे विभाग प्रमुख, इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर, महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेतील अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात 31 तारखेपर्यंत कोणीही घराबाहेर पडू नये, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाने दिले आहे. पालकमंत्र्यांनी हे आदेश पाळताना ज्यांचे रोजच्या हातावरचे पोट आहे. त्या मजूर, कामगार, खानकामगार, रोजंदारी कामगार ,यांना या काळामध्ये कोणताही त्रास जाणार नाही. जिल्ह्यामध्ये जीवनावश्यक वस्तूंचा मुबलक साठा असून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने नियमीत उघडी राहणार आहे. अन्य सर्व प्रतिष्ठाने 31 पर्यंत पूर्णतः बंद ठेवण्याचे निर्देश आहेत. यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी व संबंधित यंत्रणेने आवश्यक धान्यपुरवठा करण्याबाबतचे निर्देश केले. कुटुंब संख्या बघून त्यांना 10 ते 15 किलो धान्य या कुटुंबांना वितरित केले जावे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी शेतकऱ्यांना पीक कर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यासंदर्भात पालकमंत्र्यांनी संबंधीत विभागाच्या मंत्र्यांना सूचना करणार असल्याचे सांगीतले.

होम कॉरेन्टाईन असणाऱ्या जिल्ह्यातील मुंबई, पुण्याच्या विद्यार्थ्यांनी कोरणा विषाणूची त्यांना लागण झाली असे समजू नये. प्रशासन मुद्दाम त्रास देत नसून आपली व समाजाची काळजी घेत आहे.मात्र बाधा होणार नाही यासाठी घराबाहेर पडू नये.पुढील काही दिवस आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. एखाद्याच्या चुकीमुळे अवघ्या समाजाला त्याची किंमत चुकवावी लागते. त्यामुळे जिल्हा यंत्रणेने जारी केलेल्या आवश्यक दूरध्वनी क्रमांकाचा वापर करून थोडे जरी लक्षण आढळल्यास तपासणी करावी. आपल्या कुटुंब व समाजातील अन्य लोकांच्या संपर्कात येऊ नये, मात्र शासनाचे आदेश न पाळणाऱ्या अशा व्यक्तींवर पोलिसांना मग सक्तीने कारवाई करावी लागेल.ज्यांना अशा पद्धतीचे लक्षण आढळून येतील त्यांना वन अकादमीमध्ये गरज पडल्यास विलगीकरण कक्षात पाठवण्यात येईल. याठिकाणी आणि वैद्यकीय सेवा सोबतच खानपणाची व्यवस्थादेखील करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सध्या केंद्र सरकारने रेल्वे तर राज्य सरकारने एसटी बसेस बंद केलेल्या आहेत. मात्र तरीही नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर दिसून येत आहे. पूर्णतः नागरिकांनी घरातच राहून आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे उद्यापासून खाजगी वाहनांना देखील वाहतुकीसाठी 31 तारखेपर्यंत बंदी करण्यात येत आहे. सर्व जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात येत आहे. पोलीस या संदर्भात कडक कारवाई करतील असेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय आस्थापना, जिल्हा प्रशासनाचे सर्व कार्यालय तसेच सार्वजनिक ठिकाणांचे एकाच वेळी निर्जंतुकीकरण करण्याची प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी आज केली. यासंदर्भात लवकरच धोरणात्मक निर्णय घेऊन जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक ठिकाणी फवारणी करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यामध्ये सर्व आस्थापनांनी आपल्या कामगारांना देखील सुट्टी देण्याबाबतचे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे. महाजनकोला कोळसा पुरविणाऱ्या ठिकाणी फक्त कामगार कार्यरत होतील. अन्य सर्व खाणी बंद करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. बँकांमध्ये देखील वयस्क कर्मचाऱ्यांना तातडीने सुट्टी देण्यात यावी.तसेच मर्यादित स्वरूपात कामकाज सुरू ठेवावे असे त्यांनी स्पष्ट केले .

यावेळी शेतकऱ्यांना पीक कर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यासंदर्भात पालकमंत्र्यांनी संबंधित विभागाच्या मंत्र्यांना सूचना करावी, असा देखील प्रस्ताव ठेवण्यात आला.

सध्या जिल्ह्यामध्ये विदेशातून आलेले 42 नागरिक निगराणीत आहेत. कालपर्यंत 13 विदेशातून आलेल्या नागरिकांना 14 दिवसांच्या कॉरेन्टाईननंतर कोणतेही लक्षण आढळली नाही. जिल्ह्यात पुन्हा 11 विदेशातून आलेल्या नागरिकांची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंतचे सर्व तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहे ,अशी माहिती यावेळी आरोग्य यंत्रणेने दिली.

यावेळी बोलताना त्यांनी ज्यांच्यामध्ये लक्षणे असू शकतात ,अशी शक्यता आहे अशा सर्व होमकॉरेन्टाईन रुग्णांना गरज पडल्यास ट्रॅकर लावण्याची शक्यता आहे. सध्या या सर्व लोकांचे दूरध्वनी क्रमांक दिलेले असून त्यांच्याशी आपत्ती व्यवस्थापन कक्षांमधून संपर्क साधने सुरू आहे.

आपल्या आरोग्य संदर्भात कोणतीही  भीती वाटल्यास जिल्हा सामान्य रुग्णालय        07172-270669, जिल्हा परिषद आरोग्य विभाग 07172-261226, चंद्रपुर महानगरपालिका 07172-254614 व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष 1077 या प्रमुख  क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

जिल्ह्यातील वृत्तपत्र उद्या बंद करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही. यासंदर्भात शासनाचे कोणतेही निर्देश नाही. त्यामुळे जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून मुख्यत्वे नागपूरवरून येणाऱ्या पेपर वाहनांना अडवू नये, अशी सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच वृत्तपत्र विक्रेत्यांना त्यांच्या नियमित कामांपासून कोणताही पायबंद घातलेला नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.