रस्त्यावर फिराल तर पोलीस कारवाई करेल : जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार


-   जिल्हा तिसऱ्या स्टेजच्या उंबरठ्यावर असल्यामुळे प्रशासन सक्त

-   जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही

-   ग्रामीण भागात आशा वर्करकडून घेतली जात आहे माहिती

-   बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाने 14 दिवस काळजी घेण्याचे आवाहन

-  हातावरील स्टॅम्प केवळ सतर्कता व घरात राहण्यासाठी 

-  आज पासून फक्त 11 ते 5 जीवनावश्यक दुकाने उघडी राहतील

-  विनाकारण फिरणाऱ्यांना पोलीस ताब्यात घेणार

-  गरज पडल्यास हॉटेल्स ही ताब्यात घेण्याची प्रशासनाची तयारी

-   होम कॉरन्टाईन असलेल्यांनी आपली माहिती 2 वेळा घेतली जात असल्याची खात्री करावी

-  अत्यावश्यक सेवेतील  कामगार कर्मचाऱ्यांनी पोलिसांना आय कार्ड दाखवावे

चंद्रपूर,दि.24 मार्च (जिमाका) : चंद्रपुर जिल्ह्यात सध्या एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही.कोरोना विषाणूचा प्रसार हा गर्दीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संपर्कातून होत असतो. ही गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू झालेली आहे. रस्त्यावर गर्दी अथवा फिरताना दिसल्यास त्यांच्यावर पोलीस कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी निर्देश दिले आहेत.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11 वाजता व सायंकाळी 7 वाजता  सर्व विभाग प्रमुखांची बैठक झाली. या बैठकीला जिल्‍हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार ,जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, महानगरपालिकेचे आयुक्त  राजेश मोहिते ,जिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत, आदींसह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

जिल्ह्यात विदेशातून आलेल्या 44 नागरिकांना निगराणी ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत 14 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या 8 नागरिकांना उत्तम आरोग्यानंतर धोक्याबाहेर सांगण्यात आले. आणखी 6 नव्याने विदेशातून आलेल्या नागरिकांना कॉरेन्टाईन करण्यात आले आहे.

पुणे,मुंबई व इतर जिल्ह्यातून आलेले नागरिक होम कॉरेन्टाईन करण्यात आलेले आहेत. यापैकी काही प्रवाशांच्या हातावर स्टॅम्प मारण्यात आले आहे. स्टॅम्प मारले म्हणजे ते कोरोनाचे रुग्ण नाही .त्यांना केवळ पुढील 14 दिवस काळजी घेण्याचे सांगण्यात आले आहे.  त्या पद्धतीची लक्षणे दिसल्यास आरोग्य यंत्रणेची मदत घेणे अनिवार्य आहे. मात्र स्वतःला धोक्यात समजण्याचे कारण नाही. त्यामुळेच 14 दिवस आपल्या कुटुंबापासून अलिप्त राहात,घरी त्यांनी स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे , तथापि असे स्टॅम्प मारलेले काही तरुण बाहेर फिरताना दिसल्यास पोलिस त्यांना सक्तीने ताब्यात घेऊन कॉरेन्टाईन करतील असे, जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू असल्यामुळे कुठल्याही नागरिकांनी अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. तसेच कुठल्याही प्रकारचे वाहने वापरता येणार नाही. फक्त अत्यावश्यक सेवा देणारे वाहने, शासकीय वाहने, खाजगी व शासकीय यंत्रणेतील अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, बँक कर्मचारी ,आरोग्याच्या सेवा देणारे वाहनांना परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना ,वृत्तपत्रात आस्थापनांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील यामध्ये मुभा देण्यात आली आहे.

आस्थापना व शासकीय कर्मचारी यांनी स्वतःचे ओळखपत्र बाळगणे बंधनकारक आहे. अशी ओळख पत्र तपासण्याचा पोलिसांना अधिकार  आहे. ओळखपत्र विना फिरताना आढळून आल्यास त्या व्यक्तीवर पोलीस कारवाई करण्यात येईल. असे सक्त आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे.

परदेशातून तसेच पुणे,मुंबई  या ठिकाणाहून आलेल्या नागरिकांची संपूर्ण माहिती प्रशासनाकडे आहे. या सर्वांच्या घरी जाऊन तपासणी केली जात आहे व होम कॉरेन्टाईनचा शिक्का मारण्यात येत आहे.अशा व्यक्तींनी कुठेही न जाता त्यांनी 14 दिवस घरातच स्वतंत्र खोली मध्ये राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच, घरच्या इतर व्यक्तींसोबत कोणताही संपर्क येता कामा नये ही दक्षता घेणे गरजेचे आहे. अशा व्यक्तींना कुठल्याही प्रकारची लक्षणे आढळून आल्यास तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या मदत कक्षाला संपर्क करायचा आहे.

महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामीण भागामध्ये आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना अंतर्गत गृहभेटी देऊन तपासणी करण्यात येत आहे.

या गृहभेटी आशा,अंगणवाडीसेविका यांच्यामार्फत देण्यात येत आहे. गेल्या 2 दिवसात ग्रामीण भागात 15 ही तालुक्यामध्ये 2 हजार 666 नागरिकांची  नोंद घेण्यात आली आहे. विदेशातून बाहेरून आलेले  अन्य राज्यातून आलेले  सर्व नागरिक यामध्ये आले आहेत.  चंद्रपूर वगळता ग्रामीण भागातील ही संख्या असून  बाहेरून आलेल्या प्रत्येक नागरिकाने 14 दिवस घरीच काळजी घ्यावी लक्षणे दिसल्यास आरोग्य विभागाकडून, मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन करण्यात आलेले आहे. यांनी संबंधित नागरिकांना कोरोना विषाणू संदर्भात योग्य ती माहिती द्यावी व असे जोखमीचे काम आशा,अंगणवाडी सेविका व आरोग्य कर्मचारी करीत आहे. यांना नागरिकांनी योग्य ती माहिती द्यावी व यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहन, जिल्‍हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी केले आहे.

जीवनावश्यक वस्तूंची विक्री देखील मर्यादित करण्यात आली असून सकाळी 11 ते सायंकाळी 5 या कालावधीतच विक्री करता येणार आहे. रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी मुभा असणार नाही फक्त पार्सल सुविधेसाठी रेस्टॉरंट सुरू राहतील.

जिल्ह्यामध्ये व तालुक्यामध्ये आपत्ती नियंत्रण कक्ष देखील सुरू केले आहे. जर अशा व्यक्तींना जेवणाची व्यवस्था होत नसेल  त्यांच्यासाठी कम्युनिटी किचन ही व्यवस्था महानगरपालिका अंतर्गत सुरू करण्यात आली आहे. त्यांनी महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क करायचा आहे.

जी व्यक्ती होम कॉरेन्टाईनमध्ये आहे. त्यांना आयडीएसपी या जिल्हापरिषदेच्या नियंत्रणकक्षाकडून देखरेख करण्यात येत आहे.