जिल्ह्यात प्रवास व प्रवासी वाहतुकीच्या आदेशांची सक्त अंमलबजावणी करा जिल्हाधिकाऱ्यांनी दिले पोलीस विभागाला निर्देश


चंद्रपूर,दि. 9 जून (जिमाका) : फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 (1974 चे 2) चे कलम 144 अन्वये जिल्ह्यात दिनांक 1 जून 2020 ते 30 जून 2020 या कालावधीकरिता मनाई आदेश पारित करण्यात आलेला आहे. या निर्गमित केलेल्या मनाई आदेशांन्वये प्रवास व प्रवासी वाहतुकीची संबंधाने दिलेल्या सूचनेचे नागरिकांकडून पालन होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. प्रवास व प्रवासी वाहतुकीची संबंधाने संदर्भीय आदेशान्वये दिलेल्या सूचनांचे नागरिकांकडून पालन होत नसल्यास संबंधित नागरिकांवर योग्य ती कार्यवाही करावीअसे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी पोलिस विभागाला दिले आहेत.

जिल्हयातंर्गत प्रवास करण्यास (दुचाकी,चारचाकी वाहनाने) नागरिकांस कोणत्याही परवानगीची आवश्यकता राहणार नाही. परंतु चारचाकी वाहनाच्या बाबतीत वाहनचालकांसह केवळ 2 प्रवासी वैध राहील आणि वाहनामध्ये सॅनीटायजर्स ठेवून प्रवास करणाऱ्या व्यक्तीस मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील. तसेच दुचाकी करिता केवळ दुचाकी चालक यांनाच वाहन चालविण्यास परवानगी असेल.

महानगरपालिकानगरपालिकानगर पंचायत क्षेत्राकरिता प्रवासी वाहतुकीकरिता रिक्शा,ऑटोरिक्शाचालक व दोन प्रवाशांसह रिक्शा,ऑटोरिक्शाची वाहतूक सुरु राहील. परंतु रिक्शा,ऑटोरिक्शा मध्ये सॅनिटायजर ठेवणे व मास्कचा वापर करणे बंधनकारक असेल. सदर वाहतूक ही ग्रामीण क्षेत्राकरिता लागू राहणार नाही. दुचाकी, चारचाकी, रिक्शा, ऑटोरिक्शा याव्दारे सायंकाळी 9 ते सकाळी 5  या कालावधीत प्रवास करता येणार नाही.

नागरिकांनी जिल्हा प्रशासन अंतर्गत दिलेल्या सूचनांचे व आदेशाचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.