ब्रम्हपुरीला जिल्ह्यात रुपांतर करण्याचे स्वप्न लवकरच साकार होईल – पालकमंत्री विजय वडेट्टीवार #Brahamapuri

ब्रम्हपुरीला जिल्ह्यात रुपांतर करण्याचे स्वप्न लवकरच साकार होईल
 – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

 नगरपालिकेच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन

शहराला शैक्षणीक व मेडिकल हबची ओळख देणार

गोसेखुर्दसाठी मुख्यमंत्र्यांकडून वार्षिक 500 कोटी वाढीव निधी

चंद्रपूर, दि. 23 :  ब्रम्हपुरी विभागात मोठ्या प्रमाणत विकास कामे सुरू असून  ‘ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है’, असे सांगत विकास कामांच्या माध्यमातून ब्रम्हपुरी शहराचे जिल्ह्यात रुपांतर करण्याचे येथील नागरिकांचे स्वप्न लवकरच साकार होईल व यासाठी आवश्यक नागरी सोयीसुविधा या भागात निर्माण करण्यात येत असल्याचे प्रतिपादन राज्याचे इतर मागास, बहुजन कल्याण, खार जमीन विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी काल केले.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत नगरपरिषदेच्या ब्रम्हपुरी शहर पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे हस्ते करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ब्रम्हपुरीच्या नगराध्यक्षा रीता उराडे, उपाध्यक्ष अशोक रामटेके, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, मुख्याधिकारी मंगेश वासेकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपकार्यकारी अभियंता श्री. घोडमारे, सभापती विलास विखार, प्रीतेश बुरले, बाला शुक्ला, निलीमा सावरकर इ. प्रामुख्याने उपस्थित होते.
पालकमंत्री पुढे म्हणाले की, ब्रम्हपुरी विभागात गेल्या 30-35 वर्षापसून विकास कामे रखडली होती, मात्र मागील पाच वर्षापासून मोठ्या प्रमाणात विकास कामांना सुरवात झाली आहे. या 25 कोटी प्रकल्प किंमतीच्या नवीन पाणी पुरवठा योजनेसह येथील तहसिल कार्यालयाच्या इमारतीसाठी 15 कोटी, ग्रामीण रुग्णालयाकरिता 100 बेड तसेच अद्यावत शल्यचिकित्सागृह व इतर सर्व सोयीसुविधांसाठी अतिरिक्त 25 कोटी रुपये निधी, कृषी उत्पन्न बाजार समितीपुढील मैदानाला विकसित करण्यासाठी 22 कोटी, स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासाकरिता सर्वसुविधायुक्त इ-ग्रंथालयालयासाठी 7 कोटी,  रेल्वे उड्डाणपुलासाठी 75 कोटी रुपये, अंडरग्राउंड गटार योजना राबवून मच्छरमुक्त शहर करण्यासाठी 100 कोटी रुपये, शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी 30 कोटी, जलतरण तलावासाठी 4.5 कोटी, सर्व सुविधा युक्त क्रिडा संकुलसाठी 7 कोटी, अंतर्गत रस्त्यासाठी 10 कोटी, गार्डन, पोटतलावाचे सौदर्यीकरण, नगरपरिषद इमारतीचे व शहराचे सौदर्यीकरण, न्यायालयासाठी नवीन इमारत, ब्रम्हपुरी प्रवेशद्वारावर सौंदर्यीकरण, वन्यप्राण्यांचा शिरकाव गावात होऊ नये यासाठी चॅनल फेन्सींग,  मागासवीर्गीय विद्यार्थ्यांकरिता ब्रम्हपुरीमध्ये तीन अतिरिक्त वस्तीगृह तसेच इतर मागास वर्गाच्या विद्यार्थ्यांकरिता दोन वस्तीगृह, इत्यादी विकास कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यातील काही कामे पुर्ण झाली आहेत, काही सुरू आहेत तर काही प्रस्तावित आहेत. याशिवाय गोसिखुर्द सिंचन प्रकल्पाचे काम लवकर पुर्ण होऊन त्याचा फायदा येथील नागरिकांना मिळण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली असता त्यांनी कामाच्या जलद पुर्ततेसाठी वार्षिक 1000 कोटीच्या नियमित निधीव्यतिरिक्त 500 कोटी वाढीव निधी मंजूर केला असल्याचेही पालकमंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले. 
ब्रम्हपुरी येथे आवश्यक शैक्षणिक सुविधा, आयुर्वेदिक कॉलेज सुरू करून शैक्षणीक व मेडिकल हब बनविण्याचा विचार वडेट्टीवार यांनी प्रकट करून ‘सुजलाम सुफलाम ब्रम्हपुरी’ विकसित करण्यासाठी कटिबद्ध असल्याबाबत नागरिकांना आश्वस्त केले. 
ब्रम्हपुरी शहरातील सध्याची पाणीपुरवठा योजना ही 1952 च्या लोकसंख्येनुसार नियोजित होती. मात्र आता शहराची लोकसंख्या 40 हजार असून पुढील 30 वर्षातील वाढीव लोकसंख्या विचारात घेवून या नवीन पाणीपुरवठा योजनेचे नियोजन करण्यात आले आहे. शासनाच्या निर्देशाप्रमाणे प्रती माणसी प्रती दिवस 135 लिटर पाणी मिळणे गरजेचे असतांना केवळ 60 लिटर पाणी मिळत आहे. पाणी पुरवठा योजनेतून सद्या 4.3 दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होत आहे. 

आजच्या लोकसंख्येनुसार 6.83 दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे तर 1951 च्या लोकसंख्येनुसार 9.83 दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता राहणार आहे. वैनगंगा नदी येथे 12.33 दशलक्ष लिटर पाण्याचे आरक्षण असल्याने पुढील 30 वर्षासाठी ते पुरेसे ठरणार आहे. नवीन पाणी पुरवठा प्रकल्पाची किंमत 24.98 कोटी असून त्यात जलशुद्धीकरण केंद्र, नविन जलकुंभ तसेच एकूण 97.73 कि.मी. लांबीची पाणी वितरण व्यवस्था प्रस्तावित आहे.  

यावेळी नगराध्यक्षा रीता उराडे, उपाध्यक्ष अशोक रामटेके, सभापती ॲड. शुक्ला यांनी शहरातील पाणीपुरवठा योजना व इतर विकास कामांची माहिती दिली. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांनी केले. संचालन व आभार आरोग्य निरीक्षक आर.एस.ठोंबरे यांनी केले.
कार्यक्रमाला नगरपरिषदेचे नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.