रोखण्यासाठीच कडक निर्बंध – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
आपल्या जीवन आणि कार्यशैलीत मोठे बदल करण्याची गरज
मुंबई, ०९ अप्रैल : महाराष्ट्र राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढत असून या संकटाला सामोरे जायचे असेल, कोरोनाची साखळी तोडायची असेल तर कडक निर्बंध आवश्यकच आहेत पण त्याचबरोबर आपल्याला आपल्या जीवन आणि कार्यशैलीत मोठे बदल करण्याची गरज आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली डायमंड असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मदत आणि पुनर्वसन सचिव असीम गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, यांच्यासह डायमंड असोसिएशनचे पदाधिकारी सर्वश्री. कोलिन शहा, सुरेंद्र दासानी, अनुप मेहता, मेहूल शहा, रमणिक शहा, राहूल ढोलकिया, किरीट बन्साली रसेल मेहता, अरूण शहा, सब्यास्याची रे, चिराग लाखी, अरविंद संघवी, दिनेश लखानी, संजय शहा आदी मान्यवर उपस्थित होते.
कामगारांना शक्य असेल तर घरूनच काम द्या:
शासनाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल डायमंड असोसिएशनला धन्यवाद देऊन मुख्यमंत्री म्हणाले, संकटाची चिंता नाही पण या संकटाला सामोरे जाताना सहकार्य करणाऱ्या मित्रांची नक्कीच गरज आहे. कोरोनाचे आव्हान मोठे आहे. त्यामुळे उद्योग व्यवसाय आणि व्यापार करताना गर्दी होणार नाही याची काळजी घेणे नितांत गरजेचे आहे हे मी सुरुवातीपासूनच सांगत आलो आहे. आपल्या सर्वच कामगारांना एकाच शिफ्टमध्ये न बोलवता ज्यांना घरी राहून काम करणे शक्य आहे त्यांना ते करू दिले पाहिजे, ज्यांना कारखान्याच्या आवारात यायचे त्यांच्या शिफ्ट ड्युट्या लावल्या पाहिजेत असेही ते म्हणाले. कोरोनाची आज दुसरी लाट आहे, उद्या कदाचित तिसरी येईल. आपल्याला यातून बाहेर पडायचे असेल, कोरोनाची साखळी तोडायची असेल तर काही कडक निर्बंधांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.
लस घेतली तरी कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळा:
तसेच लसीचे दोन्ही डोस घेतले असले तरी मास्क व्यवस्थित लावणे, हातांची स्वच्छता राखणे, गर्दी टाळणे आणि दो गज की दूरी राखणे आवश्यक आहे. ज्या कारखानदारांना त्यांच्या कारखान्याच्या जागेत काही कामगारांची राहण्याची व्यवस्था करणे शक्य आहे त्यांनी कारखान्याच्या आवारातच कामगारांची राहण्याची व्यवस्था करावी, त्यांचे टेस्टिंग, लसीकरण याकडे लक्ष दिले जावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
कडक निर्बंध गरजेचे
महाराष्ट्र राज्यात फेब्रुवारी २०२१ पर्यंत परिस्थिती ठीक झाली होती परंतु कोरोनाचा नवा विषाणू असा आहे जो वेगाने पसरतो. त्याला थांबवायचे असेल तर काही कडक निर्बंध आवश्यकच असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आजही ७५ ते ८० टक्के लोकांना कोरोनाची लक्षणे नाहीत, त्यांना त्रासही होत नाही परंतु ते इतरांना बाधित करू शकतात, कोरोनाचा प्रसार करू शकतात हे आपण लक्षात घेतले पाहिजे. ज्वेलरी पार्कच्या प्रस्तावास राज्य शासनाचे पूर्ण सहकार्य राहील तसेच डायमंड असोसिएशनने स्टॅम्प ड्युटी किंवा इतर ज्या मागण्या मांडल्या त्याचाही शासन गांभीर्याने विचार करेल असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
केंद्र सरकारने कामाच्या ठिकाणी लसीकरणाला परवानगी देण्याची तयारी दाखवली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना निर्गमित होताच राज्यात अशा प्रकारे लसीकरण सुरु करता येईल अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिली.
डायमंड असोसिएशनच्या विविध शंकांचे निरसन यावेळी करण्यात आले. मुख्य सचिवांनी सुरुवातीला राज्यातील कोरोना स्थिती आणि उपाययोजना यासंदर्भात उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. वाढत्या कोरोना रुग्णांमुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण निर्माण झाल्याचे ते म्हणाले. राज्यात आपण मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधा उभ्या केल्या परंतु त्याही कमी पडत असल्याने परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी कडक निर्बंध लावावे लागल्याचे ते म्हणाले.
डायमंड इंडस्ट्री शासनासोबत
डायमंड असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाने उत्पादन क्षेत्रातील कंपन्या सुरु ठेवल्याबद्दल धन्यवाद देऊन म्हटले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्य शासन कोरोना प्रतिबंधाचे काम चांगल्या प्रकारे करत आहे. संपूर्ण डायमंड इंडस्ट्री शासनाच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे सांगताना त्यांनी या उद्योगक्षेत्राला शासनाने अपेक्षेपेक्षा अधिक आणि विनाविलंब मदत केल्याबद्दल धन्यवादही दिले.