खासदार बाळू धानोरकर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जनहितात्मक मागणी
चंद्रपूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. मोठ्या प्रमाणात लोकांना कोरोनाची लागण होत असून मृत्यू होत असलेल्या नागरिकांची देखील संख्या मोठी आहे. कोरोना काळात राज्यात वयोवृद्ध, दिव्यांग किंवा एकाकी राहणाऱ्या जेष्ठ नागरिकांना घराबाहेर पडावे लागू नये तसेच त्यांची गैरसोय होऊ नये याकरिता त्यांना घरपोच किंवा वेगळे लसीकरणाचे केंद्र उभारा अशी जनहितात्मक मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध नसल्यामुळे अनेकदा तासंतास वाट बघत हजारो लोक लसीकरण केंद्राच्या बाहेर उभे राहत असतात. हे लसीकरण केंद्र जणू कोरोना विषाणूच्या प्रसार होणारे केंद्र आहे कि काय असा प्रश्न अनेकदा निर्माण होत आहे. अनेकदा तासंतास उभे राहून देखील लस उपलब्ध होत नसल्याने निराश होऊन घरी परत जावे लागत आहे. परंतु यात दिव्यांग, जेष्ठ नागरिक यांची मोठी गैरसोय होत असते. ते देखील आपला नंबर लागेल या आशेने तासंतास या केंद्राच्या समोर उभे असतात. परंतु त्यांना देखील नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
समाजातील हा घटक अतिशय महत्वाचा असून या घटकाकडे या काळात लक्ष देण्याची गरज आहे. कारण या घटकाला मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूची लागण होत असल्याचे दिसून येत आहे. कोरोना पासून बचाव करण्यासाठी लस हाच एकमेव पर्याय आहे. पुढे तिसरी लाट येत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे या घटकाला कोरोनाच्या प्रादुर्भावापासून वाचविण्याकरिता त्यांना लवकरात लवकर गैरसोय न होता लस देणे गरजेचे आहे. त्यामुळे दिव्यांग, जेष्ठ नागरिकांकरिता घरपोच किंवा वेगळे लसीकरणाचे केंद्र उभारा अशी जनहितात्मक मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.