कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या कृषी केंद्रांवर कारवाई करा - पालकमंत्री विजय वडेट्टीवार , ◆ चंद्रपुर जिल्ह्यातील कृषी केंद्राची तपासणी करण्याचे आदेश, ◆ पालकमंत्र्यांकडून जिल्ह्यातील युरिया खताबाबत आढावा Chandrapur Krushi Kendra

कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या कृषी केंद्रांवर कारवाई करा - पालकमंत्री विजय वडेट्टीवार

◆ चंद्रपुर जिल्ह्यातील कृषी केंद्राची तपासणी करण्याचे आदेश

◆ पालकमंत्र्यांकडून जिल्ह्यातील युरिया खताबाबत आढावा

#Chandrapur Krushi Kendra News
चंद्रपूर दि. 18 सप्टेंबर : चंद्रपुर जिल्ह्यात खरीप हंगामासाठी मुबलक प्रमाणात युरिया खताची उपलब्धता आहे. मात्र खताच्या उपलब्धतेत अडचण निर्माण करत कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांना वाढीव दराने खताची विक्री होत असल्याच्या तक्रारी येत आहे. अशा कृषी केंद्राची तपासणी करून दोषी आढळणाऱ्या रासायनिक खत विक्री केंद्रधारकावर तातडीने कारवाई करावी, असे निर्देश राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी कृषी विभागाला दिले.
ब्रम्हपुरी येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित युरिया खताबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. 

यावेळी आमदार अभिजीत वंजारी, जिल्ह्याधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तसेच कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

केंद्र शासनाच्या धोरणानुसार रासायनिक खताचे वितरण एम-एफएमएस प्रणालीवर ई- पाॅस मशीनवर करणे बंधनकारक असतांना जिल्ह्यातील काही परवानाधारक रासायनिक खत विक्रेते ऑफलाइन स्वरूपात विक्री करत असल्यामुळे जिल्ह्याच्या पोर्टलवर युरिया खत शिल्लक दिसते.

 यामुळे खताच्या उपलब्धतेमध्ये अडचण होऊन युरिया खताची कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात येत आहे. वाढीव दराने खताची विक्री तसेच अनावश्यक खत उत्पादनांची जबरदस्तीने शेतकऱ्यांना विक्री करणाऱ्या संबंधित परवानाधारक रासायनिक खत विक्री केंद्रधारकावर कायद्याप्रमाणे निलंबनाची कारवाई करणे आवश्यक आहे. त्यासाठी पुढील दोन दिवसात कृषी केंद्राची तपासणी करून तसा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्याकडे सादर करावा व दोषी आढळणाऱ्या परवानाधारक रासायनिक खत विक्री केंद्र धारकांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.
जिल्ह्यात नियमितपणे युरिया व इतर खतांची उपलब्धता व पुरवठा होत राहील, असे सांगून पालकमंत्री पुढे म्हणाले, जिल्ह्यात मुबलक प्रमाणात युरियाचा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी काळजी करू नये. खरीप हंगाम 2021 करिता 50,690 मेट्रिक टन युरिया कृषी आयुक्तालय, पुणे यांच्याकडून आवटंन मंजूर असून दि. 1 एप्रिल ते 17 सप्टेंबर 2021 पर्यंत जिल्ह्यात 48,120 मेट्रिक टन म्हणजेच 94.92 टक्के युरियाची उपलब्धता झाली आहे व आज रोजी जिल्ह्यात 7925 मेट्रिक टन युरिया शिल्लक आहे. 
खरीप हंगाम 2021 (30 सप्टें. 2021)अखेर युरिया खताची 6083 मेट्रिक टन उपलब्धता नियोजित आहे. दि. 1 ऑक्टोबर 2021 पासून रब्बी हंगामास सुरुवात होत असून चंद्रपूर जिल्हाकरिता 22,240 मेट्रिक टन युरिया खताचे आवंटन कृषी आयुक्तालयाने मंजूर केले आहे. त्यानुसार युरिया खताची जिल्ह्यात नियमित उपलब्धता असणार आहे.

सद्यस्थितीत खरीप हंगाम सुरू असून भात, कापूस, सोयाबीन ही मुख्य पिके आहेत. जिल्ह्यात 4,46,100 हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून आतापर्यंत 4,55,521 म्हणजेच 94.93 टक्के क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे. जिल्ह्यात समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाली असून विविध ग्रेडच्या रासायनिक खतांची पिकांना मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बराटे यांनी यावेळी सांगितले.