समस्यांना उत्तर शोधणाऱ्या युवकांची राष्ट्राला गरज : डॉ. लेकुरवाळे, गांधी रिसर्च फाऊंडेशन आयोजित ग्राम संवाद सायकल यात्रेचा समारोप The nation needs youth who find answers to problems: Dr.Lekurwale Concluding Gram Samvad Cycle Yatra organized by Gandhi Research Foundation



समस्यांना उत्तर शोधणाऱ्या युवकांची राष्ट्राला गरज : डॉ. लेकुरवाळे

गांधी रिसर्च फाऊंडेशन आयोजित ग्राम संवाद सायकल यात्रेचा समारोप

#Loktantra Ki Awaaz 
जळगाव - आज राष्ट्राला समस्यांचे उत्तर शोधणाऱ्या युवकांची गरज असून ग्राम संवाद सायकल यात्रेत सहभागी सर्व यात्रींनी हे दाखवून दिले आहे; राष्ट्रासमोरील समस्यांचे उत्तर गांधीजींच्या विचारात असून आपण ग्राम संवाद सायकल यात्रेच्या माध्यमातून हे काम प्रामाणिकपणे केल्याचे दिसून येते असे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांनी केले. गांधी रिसर्च फाऊंडेशन आयोजित ग्राम संवाद यात्रेच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या रिसर्च विभागाच्या डीन डॉ. गीता धर्मपाल, अकॅडेमिक विभागाचे डीन डॉ. अश्विन झाला, संस्थेचे समन्वयक उदय महाजन व यात्रा प्रमुख गिरीश कुळकर्णी उपस्थित होते. 

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने ३० जानेवारी ते १० फेब्रुवारी या कालावधीत ग्राम संवाद सायकल यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. फ्रान्स, नेपाळसह भारतातील विविध राज्यातील ३५ युवकांचा यात्रेत सहभाग होता. यात्रेत जळगाव, यावल व चोपडा तालुक्यातील ४८ गावांना भेटी देण्यात आल्या. चारित्र्य निर्माण या संकल्पनेने स्वस्थ्य व्यक्ती... स्वस्थ्य समाज... निर्मितीसाठी १ लाखाहून अधिक विद्यार्थी, विद्यार्थिनी व नागरिकांशी संवाद साधण्यात आला. यासाठी प्रदर्शनी, प्रश्नमंजुषा, पीस गेम, सापशिडी, पथनाट्य आदींचा वापर करण्यात आला. 

आपल्या मनोगतात बोलतांना डॉ. लेकुरवाळे पुढे म्हणाले कि, आजच्या युवकांनी ग्रामीण भारताला समजून घेतले पाहिजे. गांधीजींची स्वयंपूर्ण गावाची संकल्पना साकारण्यासाठी गावाला समजणे आवश्यक आहे. एका बाजूला खेडी ओस पडत असतांना आपण ग्राम संवाद सायकल यात्रेच्या माध्यमातून गाव, तेथील संस्कृती समजून घेण्याचा केलेला प्रयत्न स्तुत्य आहे. विविध प्रकारच्या व्यसनांपासून तरुणांनी दूर राहावे व एक चांगला नागरिक बनण्यासाठी केलेले जाणीव निर्माणाचे कार्य कौतुकास्पद आहे. 

कार्यक्रमाची सुरुवात प्रशांत सूर्यवंशी यांच्या गीताने झाली. मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधीजींच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. शुभम खरे, डॉ. निर्मला झाला, यश मानेकर, गायत्री कदम व सत्येन्द्रकुमार यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून सायकल यात्रेच्या १२ दिवसांचा आढावा घेतला. दीप राज भट्टराइ (नेपाळ), गुलाब भडागी, प्रेमकुमार परचाके, मयूर गिरासे, नीर झाला, हाफसा हारिस, अलेक्सिस (फ्रान्स), मुकेश यादव (नेपाळ) यांनी मनोगत व्यक्त केले. 

सर्व सहभागी सायकल यात्रींना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्रके वितरित करण्यात आली. डॉ. अश्विन झाला यांनी आभार मानले तर गिरीश कुळकर्णी यांनी सूत्र संचालन केले. कार्यक्रमास दीपक मिश्रा, चंद्रकांत चौधरी, विक्रम अस्वार, सागर टेकावडे, अजय वंडोळे, ज्योती सोनवणे, विश्वजित पाटील, ऐश्वर्या तांबे, सुशीला बेठेकर, नेहा पावरा, प्राजक्ता ढगे, शिवम राठोड, उमेश गुरमुले, रोशिनी (मणिपूर), विनोद पाटील, शिवाजी मराठे या सायकल यात्रींसह गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकारी उपस्थित होते.

The nation needs youth who find answers to problems: Dr.Lekurwale Concluding Gram Samvad Cycle Yatra organized by Gandhi Research Foundation

#Thenationneedsyouthwhofindanswerstoproblems
#DrLekurwale Concluding 
#GramSamvadCycleYatra  #GandhiResearchFoundation
#Jalgaon