डॉ.भागवत कराड यांनी घेतला मराठवाडा विकास मंडळाचा आढावा


औरंगाबाद, दि.10 मार्च :-  मराठवाडा विकास मंडळास प्राप्त 50 कोटी विशेष निधीच्या खर्चाच्या नियोजना संदर्भात जिल्ह्यांकडून प्राप्त प्रस्तावांच्या प्रशासकीय मान्यता त्यातील तांत्रिक अडचणी तसेच करावयाची कार्यवाही याबाबत आज मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ.भागवत कराड यांनी आढावा घेतला. 
जिल्हाधिकारी कार्यालयातील मराठवाडा विकास मंडळाच्या सभागृहात आयोजित या आढावा बैठकीत उपायुक्त (नियोजन) रवी जगताप, सदस्य सचिव डॉ.विजयकुमार फड, तज्ज्ञ सदस्य शंकरराव नागरे, डॉ.अशोक बेलखोडे, जालना जिल्हा परिषदेचे लेखा व वित्त अधिकारी उत्तम चव्हाण, बीड जिल्हा परिषदेचे उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी सुहास विसपुते, बीड जिल्हा परिषदेचे प्रकल्प संचालक दादाराव वानखेडे, उपविभागीय कृषी अधिकारी बी.एस.कच्छवे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी परभणी स.बा.अळसे, बीडचे कृषी उपसंचालक सी.डी.पाटील, सहआयुक्त मानव विकास विनोद कुलकर्णी, वैभव कुलकर्णी (जालना), सहायक जिल्हा नियोजन अधिकारी बीडचे अपर्णा गुरव, उमेश वाघमारे (परभणी), पी.एस.थोरात (नांदेड), बाळासाहेब भिसे (हिंगोली), तसेच उमेश कहापे (जिल्हा समन्वय, माविम जालना) प्रशासकीय अधिकारी रविंद्र कांबळे आणि इतर अधिकारी उपस्थित होते. 
यावेळी डॉ.कराड यांनी मंडळास प्राप्त झालेल्या 50 कोटी निधीच्या अनुषंगाने मराठवाड्यात विविध विकास व शाश्वत प्रगती साधणाऱ्या कामांचे जिल्ह्यांकडून प्राप्त प्रस्तावांना प्रशासकीय मान्यतेतील तांत्रिक अडचणींबाबत चर्चा केली. त्याचबरोबर मंडळातर्फे मंजूर केलेल्या योजनांची दिलेल्या सूचनेप्रमाणे कार्यवाही त्यांचा प्रगती अहवाल दर महिन्यात सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
ज्या प्रस्तावाला जिल्हाधिकारी स्तरावरुन मंजूरी देण्यात आल्या त्या कामांना निधीची मागणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे होणाऱ्या बैठकीत मागणी करण्यात येणार आहे. तसेच विभागातील समस्या अडचणीही मांडणार असल्याचे डॉ.कराड यांनी सांगितले.