महाराष्ट्र सरकारने दिली ‘ही’ 4 कारणे
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत गुरूवारी चंद्रपुर जिल्ह्यासाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 2015 पासून चंद्रपूर जिल्ह्यासाठी दारूबंदी लागू केली होती. परंतू या दारूबंदीमुळे चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत असल्यानं राज्य सरकारने दारूबंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर विरोधीपक्षाने या प्रकरणात सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यासाठी दारूबंदी उठवण्यामागे राज्य सरकारने 4 महत्वाची कारणं सांगितली आहेत.
1. रमानाथ झा समितीने काढलेल्या निष्कर्षाप्रमाणे दारूबंदीची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणावर अपयशी ठरली असून, जिल्ह्यात अवैध हातभट्टी दारू आणि बनावट दारू काळ्या बाजारात उपलब्ध होत आहे. ही दारू अतिशय घातक आहे. यातून दारूचा काळाबाजार देखील वाढला आहे.
2. सरकारचे वैध दारू विक्रीमधून मिळणाऱ्या महसूलाचे मोठं नुकसान झालं आहे व गुन्हेगारी क्षेत्रातील खासगी व्यक्तींचा प्रचंड आर्थिक फायदा झाला आहे.
3. बेकायदेशीर दारू व्यापारात स्त्रिया आणि मुले यांचा वापर केला जात आहे. स्त्रिया आणि मुले वाढत्या सहभागामुळे चिंता निर्माण करण्यासारखी परिस्थिती झाली आहे.
4. दारूबंदीच्या बाबतीत बहुसंख्य संघटना, नागरिक व रहिवाशांनी दारूबंदी मागे घेण्याच्या बाजूने कौल दिला आहे. या कारणांमुळे झा समितीने दारुबंदी उठविण्याबाबत निष्कर्ष काढला आहे, असं कारणं सरकारने दिलं आहेत.
दरम्यान, या प्रकरणावरून विरोधीपक्षाने ठाकरे सरकारवर कडाडून टीका केली आहे. तर सर्वच स्तरातून या निर्णयाविरूद्ध आवाज उठवला जात आहे. सरकारच्या निर्णयानंतर पद्मश्री डॉ. अभय बंग आणि डॉ.राणी बंग यांनी हा चंद्रपूरसाठी काळा दिवस असल्याचं मत व्यक्त केलं आहे.