भाऊ, आपण लस घेतली ना? शासनाचे ३५० कर्मचारी करणार महानगर पालिका क्षेत्रात लसीकरणासाठी जनजागृती, ३९ हजार व्यक्तींनी अद्यापही लस घेतलेली नाही Vaccine CMC Chandrapur


भाऊ, आपण लस घेतली ना?

शासनाचे  ३५० कर्मचारी करणार महानगर पालिका क्षेत्रात  लसीकरणासाठी जनजागृती  

३९ हजार व्यक्तींनी अद्यापही लस घेतलेली नाही

चंद्रपूर, ता. १७ : कोरोनाला हरविण्यासाठी सध्यातरी लस हा एकमेव पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे लसीचे दोन्ही डोस घेऊन स्वतःसह आपल्या कुटुंबीयांना सुरक्षित ठेवा. भाऊ, आपण लस घेतली ना? घेतली नसेल तर मनपाच्या लसीकरण केंद्रावर जाऊन आजच लस घ्या, अशी विनंती आता मनपाचे ३५० कर्मचारी करणार आहेत.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या हद्दीत १८ वर्षावरील एकूण २ लाख ५१ हजार ७०० व्यक्ती लसीकरणासाठी पात्र आहेत. यातील जानेवारी ते नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत ८५ टक्के म्हणजेच सुमारे २ लाख ६ हजार नागरिकांनी लसीची पहिली मात्रा घेतली. यातील १ लाख १५ हजार नागरिकांची दुसरी मात्रा पूर्ण झाली. ज्या नागरिकांनी अद्याप लस न घेतलेल्या १५ टक्के नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी महानगरपालिकेचे ३५० कर्मचारी जनजागृती करणार आहेत.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या राणी हिराई सभागृहात लसीकरण आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल, उपायुक्त अशोक अशोक गराटे, सहायक आयुक्त विद्या पाटील, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार यांची उपस्थिती होती.

अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल म्हणाले, मागील दीड वर्षांपासून कोरोनाला हरविण्यासाठी महानगरपालिका सातत्याने प्रतिबंधात्मक उपाय करीत आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट भीषण होती. आपण आता कोरोना लढ्याच्या अंतिम टप्यात आहोत. पण, १०० टक्के विजयी होण्यासाठी संपूर्ण लसीकरण होणे
गरजेचे आहे. सध्यस्थितीत ८५ टक्के व्यक्तींनी लस घेतली. मात्र, सुमारे ३९ हजार व्यक्तींनी अद्यापही लस घेतलेली नाही. त्यामुळे अशा नागरिकांना प्रोत्साहित करून त्यांच्या मनातील संभ्रम दूर करा, असे आवाहन केले.