ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांसाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर- विजयलक्ष्मी बिदरी Use of electric vehicles for tourists in Tadoba-Andhari Tiger Reserve - Vijayalakshmi Bidari, Tiger Project Local Advisory Committee meeting

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांसाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर- विजयलक्ष्मी बिदरी

⭕ व्याघ्र प्रकल्प स्थानिक सल्लागार समितीची बैठक

🚙 इलेक्ट्रिक वाहनांचा देशात पहिल्यांदा वापर

⭕ विदेशी पर्यटकांसाठी गाईडला इंग्रजी भाषा प्रशिक्षण

⭕ बफरमधील गावांना कौशल्य विकास प्रशिक्षण

⭕ हॉटेल व रिसॉर्टमध्ये स्थानिकांना 50 टक्के नोकऱ्या

नागपूर, दि. 23 जानेवारी: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पांतर्गत पर्यटनासाठी इलेक्ट्रिकल वाहनांना प्रोत्साहन देण्यात येणार असून प्रत्येक गेटवर या वाहनांना परवानगी देण्यात येणार आहे. देशात प्रथमच इलेक्ट्रिक वाहनांचा पर्यटनासाठी उपयोग करण्यात येत आहे. स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी कौशल्य विकासाचे विशेष प्रशिक्षण सुरु करण्याच्या सूचना, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिल्या.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत निसर्ग पर्यटनासंबंधी नियमन करणे तसेच व्याघ्र प्रकल्प व सभोवतालच्या क्षेत्राच्या सोयी सुविधांच्यादृष्टिने वाढ करण्यासाठी विभागीय आयुक्त श्रीमती बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या स्थानिक सल्लागार समितीची बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या. 
   यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक कुशाग्र पाठक, ताडोबा कोअरचे उपसंचालक नंदकिशोर काळे, अप्पर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, मानद वन्यजीव रक्षक विवेक करंबळेकर, उपविभागीय अधिकारी श्रीमती शिवनंदा लंगडापूरे, मोहर्लीच्या सरपंच श्रीमती सुनिता कातकर, कोलाऱ्याच्या श्रीमती शोभाताई कोइचाळे, निसर्ग पर्यटन मंडळाचे धनंजय बापट, ट्रॅक्स संस्थेच्या श्रीमती पुनम धनवटे, इको-प्रो संस्थेचे बंडू धोतरे, मुकेश भांदककर, किरण मनुरे, योगेश दुधपचारे, अनिल तिवाडे, संजय मानकर, प्रफुल्ल सावरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. 
ताडोबा-अंधारी या  प्रकल्पामध्ये वाघाचे सर्वाधिक वास्तव्य असल्यामुळे देश व विदेशातील पर्यटकांची  संख्या सातत्याने वाढत आहे. पर्यटकांना आवश्यक सुविधा निर्माण करतांनाच वन्यजीव तसेच जंगलाचे संरक्षण महत्वाचे आहे. कोअर तसेच बफर क्षेत्रात पर्यटकांसाठी निर्धारित क्षेत्रात सुमारे दीडशे पेक्षा जास्त वाघांचे वास्तव्य आहे. पर्यटकांना या क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी गाईड, वाहन चालक तसेच हॉस्पीटॅलीटी उद्योगामध्ये रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होत आहेत. या परिसरात सुमारे 82 गावे असून त्यापैकी 62 गांवातील कुटुंबांना विविध रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. उर्वरित गावांसाठी कौशल्य विकास विभागातर्फे विशेष प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिल्यात. 
ताडोबा येथे भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी एनआयसी तर्फे विकसीत केलेल्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन आरक्षणाची सुविधा उपलब्ध असून पर्यटकांच्या सुविधेसाठी हेल्प लाईन क्रमांक,स्वतंत्र मदत केंद्र उपलब्ध आहे. पर्यटन वाढीला प्रोत्साहन देतांनाच पर्यटकांच्या प्रतिक्रीया नोंदवून त्यानुसार आवश्यक सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. पर्यटनाच्या दृष्टिने विविध उपक्रम राबवितांना पर्यटकांचा सहभाग कसा वाढेल यावर विशेष भर देऊन पर्यटन विकासाचा आराखडा तयार करा, या सुविधांसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशा सूचना विभागीय आयुक्तांनी यावेळी दिल्या. 

🔊 रिसॉर्टमधील ध्वनीप्रदुषण प्रतिबंधासाठी  समिती
ताडोबा-अंधारी प्रकल्पाच्या बफर क्षेत्राबाहेर हॉटेल्स, रिसॉर्ट्स संदर्भात आवश्यक परवानगी तसेच बांधकाम नियमानुसार असल्याबाबतची तपासणी करतांनाच येथे ध्वनीप्रदुषण तसेच मोठ्या प्रमाणात विद्युत दिव्यांची प्रखर रेाषणाई संदर्भात वन, महसूल तसेच स्थानिक पदाधिकारी यांची समिती गठित करुन येत्या तीन महिन्यात अहवाल सादर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्यात. 
आदरातिथ्य उद्योगामध्ये स्थानिकांना प्राधान्याने रोजगार उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यामुळे किमान 50 टक्के रोजगार बफर क्षेत्रामध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्राधान्याने द्यावा अशा सूचना करतांना श्रीमती बिदरी यांनी बफर क्षेत्रात होम स्टे करिता स्थानिक कुटुंबांनाच प्राधान्य आहे. बफर क्षेत्रातील सर्व रिसॉर्ट्स , होमस्टे नियमितीकरणासाठी  तपासणी करावी व नियमबाह्य असलेल्यांवर त्वरीत कार्यवाही करावी. या क्षेत्रातील सर्व जीप्सीधारक हे स्थानिक असावे व मंजुर पर्यटन आराखड्यानुसार त्यांची नोंदणी करावी. गाईड यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठी तसेच विदेशी पर्यटकांच्या दृष्टिने इंग्रजी व हिंदी भाषेचे प्रशिक्षण, व्याघ्र प्रकल्पात असलेले वन्यजीव, पक्षी तसेच वृक्षांबद्दलची संपूर्ण माहितीबाबत विशेष प्रशिक्षण आयोजित करावे अशा सूचना यावेळी करण्यात आल्या. 
इरई सिंचन प्रकल्पाच्या बॅक वॉटर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वन्यजीवांचा वावर आहे. परंतु या क्षेत्रात तारेचे कुंपण टाकून शेती करण्यात येत आहे. त्यामुळे वन्यजीवांना पिण्याच्या पाण्यापर्यंत पोहचणे शक्य होत नाही. त्यामुळे महाजनकोच्या माध्यमातून सर्व अतिक्रमण काढुन तेथे वृक्षारोपणासारखा उपक्रम राबविण्याला प्राधान्य देण्यात यावे अशी सूचना करतांना श्रीमती बिदरी यांनी पर्यटकांसाठी उपलब्ध जीप्सी तसेच पर्यटक शुल्कामध्ये वाढ करण्याच्या दृष्टिने प्रस्ताव तयार करावा, तसेच बफर क्षेत्रात पर्यटकांसाठी आवश्यक नियम तयार करुन त्यानुसार पर्यटनाचा मार्ग निश्चित करावा असेही श्रीमती बिदरी यांनी सांगितले. 
प्रारंभी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक कुशाग्र पाठक यांनी स्थानिक सल्लागर समितीच्या मागील बैठकीचे इतिवृत्त सादर करुन त्यावर केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. यावेळी श्रीमती पूनम धनवटे, बंडू धोतरे, धनंजय बापट, योगेश दुधपजारे तसचे सरपंच श्रीमती शोभाताई कोचाडे व सुनिता कातकर यांनी विविध सूचना मांडल्या. त्याअनुषंगाने अहवाल सादर करावा असे यावेळी विभागीय आयुक्तांनी सांगितले.

Use of electric vehicles for tourists in Tadoba-Andhari Tiger Reserve - Vijayalakshmi Bidari


 ⭕ Tiger Project Local Advisory Committee meeting


 🚙 First use of electric vehicles in the country


 ⭕ English language training for guides for foreign tourists


 ⭕ Skill development training to villages in buffer


 ⭕ 50 percent jobs for locals in hotels and resorts