विकास फाऊंडेशन पूर्ण ताकदीने संदीप जोशी यांच्या सोबत, चरण वाघमारे यांनी केला विजयाचा संकल्प vikas foundation

विकास फाऊंडेशन पूर्ण ताकदीने संदीप जोशी यांच्या सोबत,

चरण वाघमारे यांनी केला विजयाचा संकल्प

भंडारा , ता. २४ : पदवीधरांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने शंभर टक्के योग्य उमेदवार दिला असून विकास फाऊंडेशन पूर्ण ताकदीने संदीप जोशी यांच्या सोबत आहे, असा विश्वास विकास फाऊंडेशनचे सर्वेसर्वा माजी आमदार चरण वाघमारे यांनी व्यक्त केला. 

मोहाडी येथे झालेल्या हितगुज सभेमध्ये विकास फाऊंडेशनचे अध्यक्ष चरण वाघमारे यांनी संदीप जोशी यांच्या विजयाचा संकल्प केला. 

यावेळी बोलताना ते म्हणाले, पक्षाने दिलेले उमेदवार संदीप जोशी यांच्यासाठी विकास फाऊंडेशन पूर्णपणे प्रयत्न करीत आहे. तुमसर आणि मोहाडी तालुक्यामध्ये एकूण मतदानापैकी ६० टक्के मतदार नोंदणी विकास फाऊंडेशनने केली आहे. हे संपूर्ण मतदार संदीप जोशी यांनाच पहिला पसंतीक्रम देतील, हा विश्वास आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा गड कायम राखण्यासाठी मतभेद विसरून सर्व शक्तीने करू, असा विश्वास विकास फाऊंडेशनचे सर्वेसर्वा माजी आमदार चरण वाघमारे यांनी व्यक्त केला. 

संदीप जोशी मागील अनेक वर्षांपासून नागपूर शहरात विविध सामाजिक कार्य करीत आहेत. मेडिकलमधील रुग्णांच्या नातेवाईकांसाठी दहा रूपयांत पोटभर जेवण देणारी दीनदयाल थाली असो, गोरगरिबांचे आरोग्य जपणारी दीनदयाल फिरता दवाखाना असो, भव्य आरोग्य शिबिराद्वारे हजारोंची निःशुल्क शस्त्रक्रिया असो की शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील कार्य असो यातील संदीप जोशी यांचे योगदान आणि कार्याची यादी मोठी आहे. राजकारणात राहून २० टक्के राजकारण आणि ८० समाजकारण करा, या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विचारांचा आदर्श घेऊन कार्य करणाऱ्या सामान्य कार्यकर्ता ते महापौर पदापर्यंत पोहोचलेल्या संदीप जोशी यांनाच पहिले पसंतीक्रम द्या, असे आवाहनही यावेळी चरण वाघमारे यांनी केले.